बेस्टच्या २३ आगारांच्या व्यावसायिक वापरावर प्रश्न; कामगार, प्रवासी व स्थानिकांच्या हितासाठी विविध मागण्या


मुंबई | जनता प्रभाव न्यूज | गणेश तळेकर-: बेस्टच्या २३ आगारांचा व्यावसायिक वापर करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे हित, प्रवासी सेवा, स्थानिक नागरिक आणि मराठी उद्योजकांच्या सहभागाबाबत विविध मागण्या पुढे आल्या आहेत. यासंदर्भातील निवेदन संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी व्यावसायिक विकासाचे नियोजन होत असले, तरी या प्रक्रियेत कामगारांचे हक्क, प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधांचा दर्जा आणि स्थानिकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. निवेदनात प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कोणत्याही बेस्ट कर्मचाऱ्याच्या नोकरीवर परिणाम होऊ नये, तसेच नव्या प्रकल्पांमध्ये बेस्ट कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांना रोजगारात प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन बेस्टच्या बस ताफ्यात ५,००० बसांची भर घालावी, जेणेकरून गर्दी कमी होऊन प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा उपलब्ध होईल, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, आगारांमध्ये उभारण्यात येणाऱ्या व्यावसायिक गाळे, दुकाने आणि कार्यालयांमध्ये स्थानिक व्यापारी, मराठी उद्योजक आणि महिला बचत गटांना संधी मिळावी, तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) अंतर्गत होणाऱ्या निविदा प्रक्रियेत लघु व मध्यम उद्योजकांचाही सहभाग सुनिश्चित करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी संबंधित प्रशासनाकडे सादर केले असून, या मागण्यांचा विचार करून पुढील धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!