पिंपरी-चिंचवडमधील शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा कथित घोटाळा; ‘दोषींवर तातडीने कारवाई करा’

मुंबई | जनता प्रभाव न्यूज-: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करत राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असून दोषींना कोणताही राजकीय आश्रय न देता कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ९ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात राऊत यांनी नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही नगरसेवकांनी त्यांच्या निदर्शनास शालेय गणवेश, बूट, स्वेटर, रेनकोट, दप्तर आदी साहित्याच्या खरेदी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा मुद्दा आणून दिला. विद्यार्थ्यांच्या हितासाठी खर्च होणारा निधी नियमबाह्य पद्धतीने वापरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रानुसार, तीन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया बंधनकारक असताना ती डावलून परस्पर काम देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने शालेय साहित्याच्या दरांबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन करण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे पत्रात म्हटले आहे. या कथित घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधित मंत्री, अधिकारी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संपूर्ण व्यवहाराची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी राऊत यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या संदर्भातील कागदपत्रेही मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, या आरोपांवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका किंवा संबंधित संस्थांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच आरोपांचे सत्य स्पष्ट होणार आहे.
जनता प्रभावचा सवाल… विद्यार्थ्यांच्या हक्काच्या निधीवर डल्ला मारणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार का? की हा कथित घोटाळाही फाईलमध्येच दडपला जाणार? राज्याचे लक्ष आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

