आयुष्मान आरोग्य मंदिर, पोफळी येथे आयोजित जनआरोग्य समितीच्या मासिक सभेत नव्या कार्यकारिणीची स्थापना व पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर उपस्थित मान्यवर
मासिक सभेत विविध पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड; आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
शिरगाव प्रतिनिधी : मुनीर शेख-:आयुष्मान आरोग्य मंदिर, पोफळी येथे जनआरोग्य समितीची मासिक सभा उत्साहपूर्ण आणि विधायक वातावरणात पार पडली. या सभेत नव्या जनआरोग्य समितीची स्थापना करून विविध पदांवरील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गावातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.समितीच्या अध्यक्षपदी ग्रामपंचायतीचे सरपंच उस्मान सय्यद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपसरपंच संकेत सुवार यांनी समितीच्या कार्यात सक्रिय सहभागाची भूमिका स्पष्ट केली. सहअध्यक्षपदी प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सावली पवार यांची निवड करण्यात आली.ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्षपदी श्रीराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, पोफळीच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंकिता पाटील यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची सविस्तर माहिती देत, प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आरोग्य सेवांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, नियमित आरोग्य तपासणी, माता-बाल आरोग्य आणि जनजागृती अभियान अधिक गतिमान करण्याचे आवाहन त्यांनी केले.सभेत शालेय आरोग्य प्रतिनिधी म्हणून शिक्षक मोहसीन पटेल यांची निवड करण्यात आली. गावातील आरोग्य, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध, माता-बाल आरोग्य तसेच विविध शासकीय आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. ‘निरोगी ग्राम, सुदृढ समाज’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्यसेवक, महिला बचत गटाच्या सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी समितीच्या माध्यमातून गावातील आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

