‘हा पुतळा म्हणजे स्वातंत्र्य, समाजसेवा आणि निडर पत्रकारितेच्या तेजस्वी परंपरेचा गौरव’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | देशाच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मुंबई स्टॉक एक्सचेंजसमोर स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ समाजनेते, माजी मंत्री आणि ‘लोकमत’ समूहाचे संस्थापक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मुंबई स्टॉक एक्सचेंजसारख्या देशाच्या प्रतिष्ठेच्या स्थळी बाबूजींचा पुतळा उभारला जाणे, हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून राष्ट्रसेवा, लोकहितकारी राजकारण आणि मूल्याधिष्ठित पत्रकारितेच्या अखंड परंपरेचा गौरव आहे.”
समारंभास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, ॲड. आशिष शेलार, संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी स्वातंत्र्यलढ्यात युवकांना संघटित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती केली, संघर्ष केला आणि कारावासही भोगला. राष्ट्र प्रथम, समाज सर्वोच्च आणि लोकसेवा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते.महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात विविध खात्यांची धुरा सांभाळताना त्यांनी विकासाभिमुख, संवेदनशील आणि लोककल्याणकारी प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याची छाप आजही विविध विभागांमध्ये कायम असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.पत्रकारितेतील त्यांच्या योगदानाचा गौरव करताना मुख्यमंत्री म्हणाले, “‘लोकमत’ची स्थापना करून बाबूजींनी मराठी पत्रकारितेला नवे बळ दिले. सत्य, लोकहित आणि सामाजिक बांधिलकी यांचा ध्यास घेणारी पत्रकारिता त्यांनी रुजवली. आज ‘लोकमत’ हा केवळ वृत्तपत्र समूह नसून जनविश्वासाचा मजबूत आवाज बनला आहे. त्याचे संपूर्ण श्रेय बाबूजींच्या दूरदृष्टीला आणि ध्येयवादी विचारांना जाते.”मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांचे जीवन हे स्वातंत्र्यसैनिकाच्या त्यागाचे, लोकनेत्याच्या संवेदनशीलतेचे, समाजसेवकाच्या समर्पणाचे आणि पत्रकाराच्या निर्भीड मूल्यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजसमोरील त्यांचा पुतळा भावी पिढ्यांना राष्ट्रप्रेम, लोकसेवा आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेची प्रेरणा देत राहील.
मुंबई स्टॉक एक्सचेंजसमोर स्वर्गीय ‘बाबूजी’ जवाहरलाल दर्डा यांना अभिवादन
- जाहिरात
- नवीनतम पोस्ट
- POLL

