मुंबई | जनता प्रभाव न्यूज-: धारावी पुनर्विकास प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे धारावीत कथित अनधिकृत बांधकामे मात्र सर्रास सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या बांधकामांविरोधात वारंवार लेखी तक्रारी करूनही बृहन्मुंबई महानगरपालिका जी/उत्तर विभाग आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प (DRP) प्रशासनाच्या दफ्तरी दिरंगाईमुळे प्रत्यक्ष कारवाई शून्यावरच असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मनपा जी/उत्तर विभागाकडे तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकरण डीआरपीकडे पाठविल्याचे सांगितले जाते. मात्र डीआरपी कार्यालयात विचारणा केल्यास, कारवाईसाठी प्रकरण पुन्हा मनपा जी/उत्तर विभागाकडेच पाठविल्याचे उत्तर दिले जाते. या परस्पर पत्रव्यवहाराच्या फेऱ्यात तक्रारदारांची अक्षरशः दमछाक होत असून, अनधिकृत बांधकामे मात्र सुरूच असल्याचा आरोप आहे.
नेमकी कारवाई कोण करणार? मनपा की डीआरपी? हा प्रश्न आता धारावीकरांसमोर उभा राहिला आहे. दोन्ही विभागांकडून जबाबदारी एकमेकांवर ढकलली जात असल्याने शासकीय यंत्रणेतील दफ्तरी दिरंगाई आणि प्रशासकीय निष्क्रियता उघड होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याऐवजी फाईली आणि पत्रव्यवहाराच्या फेऱ्यांमध्ये प्रकरणे अडकवली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये गंभीर शंका निर्माण झाल्या असून, या दिरंगाईमागे नेमके कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत? असा सवालही आता उघडपणे उपस्थित केला जात आहे. सततची दफ्तरी दिरंगाई, कारवाईचा अभाव आणि जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेमुळे मनपा जी/उत्तर विभाग आणि डीआरपीच्या कार्यपद्धतीबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्यांवर तसेच निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि तक्रारदारांकडून करण्यात येत आहे. आता सर्वांचे लक्ष एकाच प्रश्नाकडे लागले आहे — धारावीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार,की दफ्तरी दिरंगाईच्या आड सर्व काही दडपले जाणार?
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अनधिकृत बांधकामांना अभय? मनपा जी/उत्तर विभाग व डीआरपीच्या दफ्तरी दिरंगाईमुळे कारवाई शून्य; भ्रष्टाचाराच्या चर्चांना उधाण
- जाहिरात
- नवीनतम पोस्ट
- POLL

