घाटकोपरमध्ये ‘मानवी मूलभूत हक्कांचा जल्लोष जयंतीचा’ भव्य सोहळा उत्साहात संपन्न


 

मुंबई (प्रतिनिधी)-घाटकोपर येथील पोलिस हॉकी ग्राऊंड, माता रमाबाई नगर समोर येथे दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ‘मानवी मूलभूत हक्कांचा जल्लोष जयंतीचा’ हा भव्य जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 

सामाजिक परिवर्तन घडविणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भीमोत्सव समन्वय समिती, घाटकोपर, शहीद स्मारक समिती तसेच घाटकोपरमधील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

यंदाचे वर्ष विशेष महत्त्वाचे ठरत असून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त चवदार तळ्याची प्रतीकात्मक देखाव्याची आकर्षक उभारणी करण्यात आली होती. या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महान विचारांचा गौरव करण्यात आला.

 

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक न्याय व समतेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प या निमित्ताने अधिक दृढ करण्यात आला. समाजप्रबोधनाच्या दृष्टीने हा सोहळा प्रेरणादायी ठरला.

 

कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले, तर संदेश उमप यांच्या प्रबोधनात्मक गीतांनी सांस्कृतिक सोहळ्याला रंगत आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

 

राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. विजय कदम व भीमोत्सव समन्वय समिती, घाटकोपर यांच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!