चेंबूर हादरले! शाळेच्या बसवर झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी


चेंबूर हादरले! शाळेच्या बसवर झाड कोसळून चिमुकल्याचा मृत्यू; अनेक विद्यार्थी जखमी

“निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” — मुंबईकरांचा संतप्त सवाल

मुंबई | प्रतिनिधी-:मुंबईतील चेंबूर परिसरात युनिव्हर्सल शाळेच्या बसवर अचानक विशाल झाड कोसळून घडलेली दुर्घटना संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी ठरली आहे. शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर क्षणार्धात मृत्यूची छाया कोसळली. या हृदयद्रावक दुर्घटनेत एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेने संपूर्ण मुंबईत शोककळा पसरली असून पालक, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न या दुर्घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून, जखमी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे, यासाठी सर्व स्तरांतून प्रार्थना व्यक्त होत आहे.दरम्यान, या दुर्घटनेची उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. तसेच मुंबईतील धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण, वैज्ञानिक छाटणी आणि नियमित देखभाल करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्रभावी यंत्रणा उभारण्याचीही मागणी करण्यात आली आहे.“एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला; आता तरी प्रशासन जागे होणार का?” हा प्रश्न आज प्रत्येक मुंबईकर विचारत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड असू नये, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा निष्काळजीपणामुळे पुन्हा कोणत्याही पालकाच्या कुशीतून लेकरू हिरावले जाऊ नये, हीच जनतेची तीव्र अपेक्षा आहे.

ईश्वर विलास ताथवडे-संपादक, जनता प्रभाव न्यूज

“आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!”


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!