साकीनाका मॅनहोल मृत्यूप्रकरणी प्रशासनाला खासदार प्रा.वर्षा गायकवाड यांचा दणका


साकीनाका मॅनहोल मृत्यूप्रकरणी प्रशासनाला खासदार प्रा.वर्षा गायकवाड यांचा दणका“नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही”; दोषींवर फौजदारी कारवाई, उच्चस्तरीय चौकशी आणि ‘सेफ्टी ऑडिट’ची मागणी

मुंबई | ईश्वर ताथवडे-: साकीनाका येथील खैरानी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणारा ठरला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत मुंबई उत्तर मध्यच्या खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सविस्तर पत्र पाठवून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कठोर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे. २ जुलै २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रात खासदार गायकवाड यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, ही घटना केवळ अपघात नसून प्रशासनाच्या गंभीर निष्काळजीपणाचा आणि सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा परिणाम आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उघडे मॅनहोल नागरिकांसाठी मृत्यूचे सापळे ठरत असताना, घटनास्थळी बॅरिकेडिंग, इशारा फलक, चेतावणी दिवे आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याने एका निष्पाप नागरिकाला जीव गमवावा लागला.खासदार गायकवाड यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच ज्यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली, त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कठोर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.याचबरोबर, मुंबईतील सुरू असलेल्या सर्व मॅनहोल, गटार आणि जलनिस्सारण दुरुस्तीच्या कामांचे तातडीने ‘सेफ्टी ऑडिट’ करण्यात यावे, प्रत्येक कामाच्या ठिकाणी बॅरिकेडिंग, परावर्तित इशारा फलक, चेतावणी दिवे आणि इतर सुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणीही खासदार गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. साकीनाका दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा निष्काळजीपणाला प्राधान्य दिले जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या पत्रामुळे या प्रकरणात दोषींवर कारवाईचा दबाव वाढला असून, नागरिक आता महापालिका प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.

जनता प्रभावचा सवाल-:नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? की दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांना कायमचा आळा घालणार?

जनता प्रभाव न्यूज–“आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!”


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!