शिवाजी पार्क विद्यार्थी आंदोलन प्रकरणाने घेतले गंभीर वळण; महिला विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप, “५०-५० ग्रॅम अमली पदार्थ खिशात टाकून अडकवू” अशी धमकी दिल्याचा दावा; पोलिस शिपायावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी,अन्यथा उच्च न्यायालयात याचिका


शिवाजी पार्क विद्यार्थी आंदोलन प्रकरणाने घेतले गंभीर वळण; महिला विद्यार्थिनींच्या विनयभंगाचा आरोप, “५०-५० ग्रॅम अमली पदार्थ खिशात टाकून अडकवू” अशी धमकी दिल्याचा दावा; पोलिस शिपायावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी,अन्यथा उच्च न्यायालयात याचिका

मुंबई | जनता प्रभाव न्यूज-: शिवाजी पार्क येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान घडलेल्या कथित घटनांमुळे राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आंदोलनादरम्यान महिला विद्यार्थिनींना कारवाईच्या नावाखाली अश्लील स्पर्श करून विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या पोलिस शिपाई दीपक बल्लाळ याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी मुंबई उच्च न्यायालयातील वकील, समाजसेविका व मानवी हक्क कार्यकर्त्या ॲड. शोभा बुद्धिवंत यांनी केली आहे. ॲड. बुद्धिवंत यांनी सांगितले की, महिला विद्यार्थिनींच्या सन्मानाशी संबंधित या गंभीर प्रकरणात त्वरित गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास जनता प्रभाव न्यूजचे तसेच संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. नितीन सातपुते यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या आंदोलनादरम्यान काही पोलिसांकडून विद्यार्थ्यांना “तुमच्या खिशात ५०-५० ग्रॅम अमली पदार्थ टाकून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्ह्यात अडकवू,” अशी धमकी दिल्याचाही गंभीर दावा करण्यात आला आहे. या संदर्भातील कथित चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. या चित्रफितीची सत्यता, त्यातील घटनाक्रम आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची भूमिका याची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ॲड. शोभा बुद्धिवंत यांनी असा प्रश्नही उपस्थित केला आहे की, महिला विद्यार्थिनींशी अशा प्रकारचे कथित गैरवर्तन करण्याचे धाडस संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना नेमके कोणाच्या पाठबळावर मिळत आहे? अशा प्रकारच्या कारवाया ही एखाद्या व्यक्तीची मनमानी आहे की त्यामागे वरिष्ठ पातळीवरील कोणते निर्देश आहेत, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, अशा धमक्या देणाऱ्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची चौकशी करून, त्याच्याकडे अमली पदार्थ कुठून येतात, अशा प्रकारच्या धमक्या देण्यामागील कारण काय आहे आणि त्यामागे कोणाचे संरक्षण आहे का, याचाही तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. जनता प्रभाव न्यूजचे तसेच संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. नितीन सातपुते यांनी सांगितले की, संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर त्वरित गुन्हा दाखल न झाल्यास आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुरू न झाल्यास, सर्व उपलब्ध पुरावे, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित चित्रफिती आणि इतर बाबींसह मुंबई उच्च न्यायालयात जनहित व घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी याचिका दाखल करण्यात येईल. या याचिकेत संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!