SpiceJetच्या विमानसेवेवर प्रश्नचिन्ह; प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत वाढली चिंता
तांत्रिक बिघाड, वारंवार विलंब, विमानातील उकाडा आणि सुविधांअभावी प्रवाशांचा संताप; DGCAकडे चौकशीची मागणी
मुंबई | देशातील प्रमुख विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या SpiceJetच्या विमानसेवेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, तासन्तास होणारे विलंब, विमानातील उकाडा आणि प्रवाशांना वेळेवर सुविधा न मिळाल्याच्या तक्रारींमुळे कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १२ ऑगस्ट रोजी दिल्ली–पुणे मार्गावरील SpiceJet विमानातील प्रवाशांना विमानात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागल्याने त्यांनी प्रवास करण्यास नकार दिला. परिणामी विमान पुन्हा बेवर आणावे लागल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर विमानांच्या तांत्रिक देखभालीबाबत आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, २३ जुलै २०२६ रोजी मुंबई–नवी दिल्ली मार्गावरील SG-816 विमानाच्या विलंबासंदर्भात करण्यात आलेल्या लेखी तक्रारीतही अनेक गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, नियोजित वेळेत वारंवार बदल करण्यात आले आणि प्रवाशांना दीर्घकाळ विमानतळावर प्रतीक्षा करावी लागली. तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, विलंबादरम्यान प्रवाशांना स्पष्ट आणि वेळेवर माहिती देण्यात आली नाही. तसेच भोजन, अल्पोपहार, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. काही कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय २७ जुलै रोजीच्या आणखी एका SpiceJet विमानालाही सुमारे चार तास विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे. अल्पावधीत समोर आलेल्या या घटनांमुळे कंपनीच्या नियोजन आणि सेवा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
DGCAने दखल घेणार का? – या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या प्रकरणाची चौकशी करणार का, याकडे विमान प्रवाशांचे लक्ष लागले आहे. विमानांची सुरक्षा, तांत्रिक स्थिती, प्रवासी सुविधा आणि सेवा व्यवस्थेची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विमान उशिरा जाणे ही केवळ गैरसोय असू शकते; मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होणे ही गंभीर बाब मानली जाते. त्यामुळे या तक्रारींची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य समोर येणे आणि आवश्यक सुधारणा होणे, हीच प्रवाशांची अपेक्षा आहे. — जनता प्रभाव न्यूज वेब डेस्क
आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!

