भेसळखोरांविरोधात सरकारचा मोठा प्रहार! ११.९३ कोटींचा माल जप्त; राज्यात नव्या प्रयोगशाळा आणि भरतीला गती


भेसळखोरांविरोधात सरकारचा मोठा प्रहार! ११.९३ कोटींचा माल जप्त; राज्यात नव्या प्रयोगशाळा आणि भरतीला गती

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची विधानसभेत घोषणा; अन्नसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध

ठळक मुद्दे

✅ ११.९३ कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त

✅ ७४.८५ लाखांचे सर्जिकल ग्लोव्हज जप्त

✅ २७.३० कोटींच्या निधीसाठी केंद्राकडे प्रस्ताव

✅ संभाजीनगर, नाशिक, नागपूर, रायगड येथे नवीन प्रयोगशाळा

✅ तपासणी अहवालाचा कालावधी ९० दिवसांवरून ३०–३५ दिवसांवर

✅ अन्न सुरक्षा अधिकारी व औषध निरीक्षकांची भरती प्रक्रियेला गती

मुंबई | प्रतिनिधी | जनता प्रभाव न्यूज-:राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून विविध कारवायांमध्ये तब्बल ११.९३ कोटी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन अत्याधुनिक प्रयोगशाळा, रिक्त पदांची भरती, आधुनिक उपकरणे आणि मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

सदस्य काशीनाथ दाते यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री झिरवाळ यांनी सांगितले की, राज्यभरात दूध, दुग्धजन्य पदार्थ, पिण्याचे पाणी, गूळ, शेंगदाणे, चहा पावडर, खाद्यतेल, गुटखा, तंबाखू, सुगंधित सुपारी आणि मावा यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात व्यापक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान विविध नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून अन्नसुरक्षेसाठी विशेष तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.याशिवाय सर्जिकल ग्लोव्हज प्रकरणात ७४.८५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून आरोग्य क्षेत्रातील अनियमित व्यवहारांवरही कठोर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण-राज्यातील अन्न व औषध तपासणी प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाकडे २७.३० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिक तपासणी उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे.

चार नवीन प्रयोगशाळा लवकरच-संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि रायगड येथे नवीन अन्न व औषध तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे काम सुरू असून पुढील तीन ते सहा महिन्यांत त्या कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.

अहवाल मिळणार अधिक वेगाने-पीपीपी तत्त्वावर २२ मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी सामंजस्य करार करण्यात आल्यामुळे तपासणी अहवाल मिळण्याचा कालावधी ९० दिवसांवरून अवघ्या ३० ते ३५ दिवसांवर आला आहे. त्यामुळे भेसळखोरांविरोधातील कारवाई अधिक वेगवान होणार आहे.

रिक्त पदे भरण्याला प्राधान्य-अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरीक्षकांच्या रिक्त पदांमुळे विभागावर ताण वाढला आहे. सध्या २०० मंजूर पदांपैकी केवळ ४१ औषध निरीक्षक कार्यरत आहेत. केंद्राच्या निकषांनुसार राज्याला सुमारे १,१०० अन्न सुरक्षा अधिकारी आणि ४०० औषध निरीक्षकांची आवश्यकता असून त्यासाठी नव्या आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

तक्रारींवर तात्काळ कारवाई-भेसळ, तेलातील मिश्रण, उघड्यावर मांसविक्री तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकारांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधातील तक्रारींचीही निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात दिली.

जनता प्रभाव न्यूज

आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!

निपक्ष • सडेतोड • निर्भीड

www.jantaprabhavnews.co.in


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!