‘बाई वाड्यावर या’ हे बाबाने कधीच म्हटलं नाही! गार्गी फुलेंचा मोठा खुलासा; निळू फुलेंच्या बायोपिकमागचा खरा अट्टाहास


मुंबई | प्रतिनिधी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते निळू फुले म्हटलं की भारदस्त आवाज, बोलण्याची खास लकब, भेदक नजर आणि पडद्यावर साकारलेला खलनायक डोळ्यांसमोर उभा राहतो. अनेक दशकांपासून त्यांच्या नावाशी ‘बाई वाड्यावर या…’ हे वाक्यही जोडले गेले आहे. मात्र, “बाबाने कोणत्याच चित्रपटात ‘बाई वाड्यावर या’ हे वाक्य म्हटलेलेच नाही,” असा स्पष्ट खुलासा त्यांची कन्या गार्गी फुले यांनी केला आहे. निळू फुले यांची ओळख केवळ एका वाक्यापुरती मर्यादित नसून, त्यापलीकडील असामान्य कलाकार, सामाजिक भान असलेला कार्यकर्ता आणि संवेदनशील माणूस नव्या पिढीसमोर यावा, यासाठीच त्यांच्या जीवनावर बायोपिक करण्याचा अट्टाहास असल्याचे गार्गी फुले यांनी सांगितले. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या, “मी कायम सांगत आले आहे की, बाबाच्या कोणत्याच चित्रपटात तो ‘बाई वाड्यावर या’ असं म्हणालेला नाही. मला हे ज्याने त्याने शोधून दाखवावं. ही एवढीच त्याची इमेज नाही. पुढच्या पिढीला आपण निळू फुले यांच्याबद्दल नेमकं काय सांगणार आहोत? बाबांची ही प्रतिमा पुसण्यासाठीच मी बायोपिकचा अट्टाहास केला आहे.” निळू फुले यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवला. नायक असो किंवा खलनायक, त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला स्वतःची वेगळी ओळख दिली. मात्र, पडद्यावरील खलनायकी भूमिकांच्या पलीकडे त्यांचे व्यक्तिमत्त्व कितीतरी व्यापक होते. सामाजिक चळवळीशी असलेली बांधिलकी, सामान्य माणसाच्या प्रश्नांविषयीची संवेदनशीलता आणि स्पष्ट वैचारिक भूमिका हीदेखील त्यांच्या आयुष्याची महत्त्वाची बाजू होती. बायोपिकच्या सुरुवातीबाबत गार्गी फुले यांनी एक रंजक आठवण सांगितली. प्रसाद ओक यांनी निळू फुले यांच्या जीवनावर बायोपिक करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा सुरुवातीला त्या काहीशा मागे सरकल्या होत्या. त्यामागचे कारण सांगताना त्या म्हणाल्या की, निळू फुले यांनी स्वतःचे आत्मचरित्रदेखील लिहिले नव्हते. त्यांचे म्हणणे होते, “मी आत्मचरित्र लिहिलं तर मी खरं लिहीन आणि मी जर खरं लिहिलं तर अर्धी इंडस्ट्री बरबाद होईल.” त्यामुळे त्यांनी कधीही आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला नाही. मात्र, निळू फुले यांच्या आयुष्यातील पडद्यामागचा माणूस नव्या पिढीसमोर येणे आवश्यक असल्याची भावना अधिक प्रबळ झाली आणि त्यातून बायोपिकच्या निर्मितीचा प्रवास सुरू झाला. गार्गी फुले, प्रसाद ओक आणि किरण यज्ञोपवीत यांनी निळू फुले यांच्या जीवनातील कोणत्या बाजू प्रेक्षकांसमोर आणायच्या, त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणत्या दृष्टिकोनातून मांडायचे आणि पुढील पिढीला निळू फुले यांची खरी ओळख कशी करून द्यायची, यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. “‘बाई वाड्यावर या’ याच्या पलीकडे तो माणूस आहे. हेच लोकांना दाखवण्यासाठी बायोपिकचा अट्टाहास केला. निळू फुले म्हणजे केवळ एवढंच नाही. त्यांचं आयुष्य कसं होतं, त्यांचा संघर्ष काय होता आणि माणूस म्हणून ते कसे होते, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे,” असे गार्गी फुले यांनी स्पष्ट केले. या बहुप्रतीक्षित बायोपिकच्या लेखनासाठी तब्बल तीन वर्षे लागली आहेत. सुरुवातीला एका कंपनीकडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार होती. मात्र, संबंधित कंपनीने मराठी चित्रपटाची निर्मिती न करण्याचा निर्णय घेतल्याने हा प्रकल्प पुन्हा टीमकडे परत आला आहे. सध्या या बायोपिकसाठी नव्या निर्मात्याचा शोध सुरू असून, प्रसाद ओक आणि किरण यज्ञोपवीत त्यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रक्रियेत आवश्यक ती मदत आपण करत असल्याचे गार्गी फुले यांनी सांगितले. सर्व काही नियोजनानुसार घडल्यास पुढील दोन वर्षांत निळू फुले यांच्या जीवनावर आधारित हा बहुप्रतीक्षित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. एका काल्पनिक वाक्याच्या चौकटीत अडकलेली निळू फुले यांची प्रतिमा मोडून, त्यामागचा संघर्षशील कलाकार, सामाजिक कार्यकर्ता आणि संवेदनशील माणूस नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न या बायोपिकमधून होणार आहे. त्यामुळे निळू फुले यांच्या चाहत्यांसह संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष आता या बायोपिककडे लागले आहे.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!