गुणांचे सागर होते अशोकराव..- सरकार्यवाह..गुणांचे सागर होते अशोकराव..- सरकार्यवाह..
श्रद्धांजली सभेतून मान्यवरांनी अशोकराव मोडकांना वाहिली आदरांजली..
मुंबई -:”प्राध्यापकांचे आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अशोकराव मोडक. ते एकप्रकारे गुणांचे सागर होते. संघाचा विषय असो, हिंदुत्वाचा विषय असो या सर्वांचा त्यांचा दांडगा व्यासंग होता. अशोकराव म्हणजे विनम्रतेचे प्रतिमूर्ती होते”, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले आहे.थोर तत्त्वचिंतक आणि संघटक, अभाविपचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार श्रद्धेय स्व. डॉ. अशोकराव मोडक यांची श्रद्धांजली सभा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, दादर पूर्व येथे पार पडली.
अशोकराव मोडक म्हणजे विनम्रतेचे प्रतिमूर्ती..
अशोकरावांच्या स्मृतीचे स्मरण करत दत्तात्रय होसबाळे पुढे म्हणाले की, बंगळूरचा मी एक नगर स्तरावरचा कार्यकर्ता होतो. १९७४ च्या अभाविपाच्या दादर मधील एका अधिवेशनात पंधरा दिवस आधी जोडून घ्यायचे आहे, असा मला निरोप आला. तेव्हा अधिवेशनातील शोभायात्रेच्या विभागाची जबाबदारी अशोकरावांकडे होती. तेव्हा अशोकराव यांच्याशी माझा संबंध आला आणि मुंबईशी माझे जिव्हाळ्याचे नाते तेव्हापासून जोडले गेले.”पुढे ते म्हणाले, “हल्ली गुगलच्या जमान्यात बऱ्याच गोष्टी सहज उपलब्ध होतात. पूर्वी या गोष्टी नव्हत्या. त्याही काळात अशोकराव मूळ अध्ययन करणारे परिश्रमी संशोधक होते. ‘मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित’ संघाच्या या गीतातील एकूण एक शब्द त्यांच्या आयुष्याशी संलग्न आहे. त्यांच्या जीवनातील एक तरी आदर्श बिंदू आपण आपल्या आचरणात आणूया हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली ठरेल.”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांनी आपल्या उद्बोधनात म्हटले की, “अशोकरावांची सहजता मनाला भावणारी होती. स्वतःचा स्वभाव आपल्याला घडवावा लागतो आणि अभ्यासाने हे साध्य होते असे ते नेहमी म्हणत. नवीन पिढीला तयार करण्याचे कर्मकठीण काम अशोकरावांनी केले.” याप्रसंगी अशोकराव मोडक यांच्या परिवारातून त्यांच्या पत्नी डॉ. अंजली अशोक मोडक, मुलगा आशिष मोडक, सून स्मिता आशिष मोडक, कन्या अर्चना भिडे, नातवंड अदिती, अवनी, अर्णव आणि अशोकरावांचे बंधू अरुण मोडक आदी उपस्थित होते.श्रद्धांजली सभेदरम्यान राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, रा.स्व.संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा राज्य प्रमुख अभय बापट, कोकण पदवीधर मंचाचे वसंतराव काणे, राष्ट्रीय सामाजिक विज्ञान परिषदेच्या सचिव वैदेही दप्तरदार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णी, भारतीय स्त्री शक्तीच्या नयना सहस्रबुद्धे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अभिराम पाटील, अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद मराठे, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक संजीव परब, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रनजी, मुलगा आशिष मोडक यांनी अशोकरावांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. अशोकराव मोडक यांना पाठवलेल्या पत्राचे वाचनही यावेळी करण्यात आले.


गुणांचे सागर होते अशोकराव..- सरकार्यवाह..गुणांचे सागर होते अशोकराव..- सरकार्यवाह..
श्रद्धांजली सभेतून मान्यवरांनी अशोकराव मोडकांना वाहिली आदरांजली..




