संशोधन प्रकाशनाच्या संधी; ‘रिड फेस्ट’मधून विद्यार्थ्यांना पुस्तकांशी जोडण्याचा प्रयत्न
पुणे-: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारामुळे शिक्षण, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. या बदलांना सामोरे जाताना विद्यार्थ्यांसह शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाशी सक्षमपणे जुळवून घेता यावे, तसेच शिक्षणामध्ये मूल्याधिष्ठित दृष्टिकोन कायम राहावा, यावर भर देण्यात येत आहे. एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे आणि इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ELTAI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय व वार्षिक परिषदेत इंग्रजी भाषा अध्यापन, संशोधन, एआयचा शिक्षण क्षेत्रावरील प्रभाव आणि मानवविद्याशाखांच्या भवितव्याबाबत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. इंग्रजी भाषा अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातील शिक्षक व संशोधकांसाठी संशोधन प्रकाशनाच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘इएलटीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. किशोर सेलवा बाबू यांनी दिली. जर्नल ऑफ इंग्लिश लँग्वेज टीचिंग (JELT) आणि जर्नल ऑफ टीचिंग ऍण्ड रिसर्च इन इंग्लिश लिटरचर (JTREL) यांसारख्या नियतकालिकांमध्ये संशोधन प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ‘रिड फेस्ट’ परिषदेबरोबरच वाचन संस्कृतीपासून दूर जात असलेल्या तरुणाईला पुन्हा पुस्तकांशी जोडण्यासाठी ‘रिड फेस्ट’ अर्थात वाचन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, पुस्तकांशी त्यांचे नाते दृढ करणे आणि वाचनसंस्कृतीला चालना देणे हा ‘रिड फेस्ट’चा उद्देश आहे. महोत्सवात विविध वर्तमानपत्रे, पुस्तक प्रकाशक आणि विद्यार्थ्यांचे स्टॉल असणार आहेत. विविध पुस्तके, वर्तमानपत्रे आणि वाचनसाहित्य विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर आणि एआयच्या प्रभावामुळे पारंपरिक वाचनाच्या सवयी बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुण पिढीला पुस्तकांकडे आकर्षित करण्यासाठी ‘रिड फेस्ट’ महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वाचनातून विचारशक्ती, ज्ञान आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जाणार आहे. एआय आणि इंग्रजी अध्यापनातील बदल इंग्रजी भाषा अध्यापनाच्या क्षेत्रात डिजिटल साधने, एआय आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर वाढत आहे. त्यामुळे शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या भाषिक, वैचारिक आणि सर्जनशील क्षमतांच्या विकासावर भर देणे आवश्यक असल्याचे परिषदेत अधोरेखित करण्यात आले. “तंत्रज्ञानातील वेगवान बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही सक्षम करणारे सर्वांगीण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण ही विद्यापीठाची भूमिका आहे. एआयच्या युगात मानवविद्याशाखांच्या भवितव्याबाबत नव्या दिशा आणि उपाय शोधण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल,” असे प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र-कुलपती तथा कार्याध्यक्ष, एमआयटी-एडीटी विद्यापीठ, पुणे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत माहिती परिषदेसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे संचालक डॉ. अतुल पाटील, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर आणि ‘इएलटीएआय’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. किशोर सेलवा बाबू उपस्थित होते.






