उपवर्गीकरणाविरोधात दलित ऐक्याचा महाएल्गार!-३० जूनला विधानभवनावर ऐतिहासिक महामोर्चा; चर्मकार समाजाचा आंबेडकर बंधूंना जाहीर पाठिंबा


उपवर्गीकरणाविरोधात दलित ऐक्याचा महाएल्गार!३० जूनला विधानभवनावर ऐतिहासिक महामोर्चा; चर्मकार समाजाचा आंबेडकर बंधूंना जाहीर पाठिंबामहामोर्चाच्या नियोजन बैठकीपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आंबेडकर बंधू, बबनराव (नाना) घोलप आणि उपस्थित मान्यवर. त्यानंतर झालेल्या बैठकीत उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

मुंबई | जनता प्रभाव प्रतिनिधी-:अनुसूचित जातींच्या ५९ जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात राज्यभर दलित समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, सामाजिक न्याय आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी विविध संघटना आता एकाच व्यासपीठावर एकवटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवार, दि. ३० जून २०२६ रोजी मुंबईतील विधानभवनावर भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या आंदोलनाचे नेतृत्व आनंदराज आंबेडकर, भिमराव आंबेडकर, माजी समाजकल्याण मंत्री बबनराव (नाना) घोलप आणि राजकुमार बडोले करणार आहेत.

या ऐतिहासिक महामोर्चाच्या नियोजनासाठी “चर्मकार समाज अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोध समिती” यांच्या वतीने मुंबईत भव्य नियोजन बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपवर्गीकरणाविरोधातील लढा अधिक व्यापक, संघटित आणि प्रभावी करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

बैठकीचे अध्यक्षस्थान माजी समाजकल्याण मंत्री बबनराव (नाना) घोलप यांनी भूषविले. राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबूराव माने, चर्मकार विकास संघाचे अध्यक्ष संजय खामकर आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांच्या प्रमुख पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीत राज्यभरातून आलेल्या विविध चर्मकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महामोर्चाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा केली. जिल्हानिहाय समन्वय, प्रसिद्धी, वाहतूक व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच विविध समित्यांच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.

समारोपावेळी भिमराव आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, “उपवर्गीकरणाविरोधातील हा संघर्ष संविधान, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांच्या संरक्षणासाठीचा आहे. दलित समाजाची एकजूटच या लढ्याची सर्वात मोठी ताकद आहे,” असे प्रतिपादन केले.

यावेळी डॉ. संदेश वाघ यांनी उपवर्गीकरणाचे घटनात्मक, कायदेशीर आणि सामाजिक परिणाम स्पष्ट करत मोर्चा शिस्तबद्ध, लोकशाही मार्गाने आणि प्रभावीपणे यशस्वी करण्याचे आवाहन केले.

बैठकीस राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सरोज बिसुरे, उमाकांत डोईफोडे, दत्तात्रेय गोतीसे, जगन्नाथ वाघमारे, दादाभाऊ माने, श्रीधर ठोंबरे, राजू नेटके, जगदीश लाड, सुनील कांबळे, छगन जाधव, जयश्री खरात, रोहिणी खंडाळे, राम कदम, विलास गोरेगावकर, राजेश खाडे, सुभाष मराठे, उल्हास वर्पे, अॅड. दिलीप वाळुंज, अशोक आगवणे, जानकी सातपुते, पूजा कांबळे, गोकुळ कदम, राजेश पुरभे, विनोद पाखरे, भानुदास राजगुरू यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी चर्मकार समाजाच्या वतीने आंबेडकर बंधूंना उपवर्गीकरणविरोधी आंदोलनासाठी जाहीर पाठिंब्याचे पत्र प्रदान करण्यात आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिकांनी ३० जून रोजी विधानभवनावर उपस्थित राहून सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले.— जनता प्रभाव न्यूज डेस्क


82
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!