विद्यापीठांच्या कॅन्टीन-मेसवर एफएसएसएआयचा दणका! परवाना अनिवार्य-नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई


एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचे राज्यातील सर्व कुलगुरूंना कडक निर्देश-विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही!

मुंबई | जनता प्रभाव न्यूज-: राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि विद्यार्थी वसतिगृहांमधील कॅन्टीन, मेस तसेच उपाहारगृहांच्या मनमानी कारभाराला आता चाप बसण्याची शक्यता आहे. या सर्व खाद्य आस्थापनांसाठी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (FSSAI) वैध नोंदणी क्रमांक किंवा परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि उच्च शिक्षण संचालनालयाला यासंदर्भात कडक निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यापीठांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यापैकी अनेक विद्यार्थी कॅन्टीन आणि वसतिगृहांतील मेसवर अवलंबून असतात. त्यामुळे अन्न तयार करण्यापासून ते साठवणूक आणि वितरणापर्यंत स्वच्छतेचे निकष पाळणे आता अनिवार्य ठरणार आहे.

खासगी कंत्राटदारांनाही परवाना आवश्यक विद्यापीठाने स्वतः कॅन्टीन चालवले किंवा खासगी कंत्राटदाराला कॅन्टीन अथवा मेस चालवण्याची जबाबदारी दिली, तरी संबंधित खाद्य व्यवसाय चालकाकडे आवश्यक एफएसएसएआय नोंदणी किंवा परवाना असणे बंधनकारक आहे. कॅन्टीनमध्ये परवान्याचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावावे लागणार आहे.

अस्वच्छता आढळल्यास परवाना निलंबित किंवा रद्द! अन्न तयार करताना अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांविरोधात कारवाई केली जाणार आहे. गंभीर उल्लंघन झाल्यास परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद लागू होऊ शकते. त्यामुळे कॅन्टीन आणि मेस चालकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! शैक्षणिक संस्थांमधील कॅन्टीन आणि मेसमध्ये अन्नाचा दर्जा, स्वच्छता आणि सुरक्षितता याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित होतात. आता एफडीएच्या या निर्देशांमुळे विद्यापीठ प्रशासन आणि कंत्राटदारांची जबाबदारी अधिक स्पष्ट झाली आहे. मात्र, केवळ परवाना घेऊन जबाबदारी संपणार नाही. प्रत्यक्षात अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, स्वयंपाकघराची स्थिती आणि साठवणुकीच्या पद्धतींची नियमित तपासणी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जनता प्रभाव न्यूजचा सवाल? विद्यार्थ्यांच्या ताटात नेमके काय वाढले जाते, यावर आता प्रशासन लक्ष ठेवणार का? एफएसएसएआयचा परवाना भिंतीवर लावण्यापुरतीच ही मोहीम मर्यादित न राहता प्रत्यक्ष अन्नाच्या गुणवत्तेपर्यंत पोहोचणार का? विद्यार्थ्यांचे आरोग्य हा केवळ विद्यापीठ प्रशासनाचा विषय नसून सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

जनता प्रभाव न्यूज-आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!

www.jantaprabhavnews.co.in

 


अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

88
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

अतिशय अर्थपूर्ण, चिंतनशील आणि वर्तमान वास्तवावर भाष्य करणारी ही कविता आहे. सदानंद खोपकर यांनी ‘अंधारानंही आता समजून चालावं’ या ध्रुवपदातून बदलत्या समाजव्यवस्थेवर, मानवी प्रवृत्तीवर, भूक, कष्ट आणि निसर्गाच्या परिवर्तनशील चक्रावर प्रभावी भाष्य केले आहे.

error: Content is protected !!