मनोगत सखे, भानावर ये… तुझ्यातील ‘स्त्री’ हरवू देऊ नकोस!


संघर्षातून मिळवलेले स्वातंत्र्य जपताना संवेदनशीलता, आत्मसन्मान आणि नात्यांमधील ओलावाही जपण्याची गरज

लेखिका : सरू ✍️ | जसजसे समाजजीवन बदलत गेले, तसतशी अनेक गृहितकेही बदलत गेली. माणसाची जडणघडण बदलली, नात्यांचे संदर्भ बदलले आणि काळाच्या ओघात भावनाही काहीशा बोथट होत गेल्या. हे केवळ पुरुषांच्या बाबतीत घडले असे नाही; स्त्रीच्या आयुष्यातही या बदलांचे खोलवर परिणाम झाले. अनेकदा समाजाच्या चौकटीत जगताना तिची स्वतःची अभिव्यक्तीच हरवून गेली. हरवलेली लेखणी पुन्हा हाती घेण्यासाठी, गमावलेला आत्मसन्मान परत मिळवण्यासाठी आणि अंधारात चाचपडणाऱ्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी स्त्रीला किती संघर्ष करावा लागला, याचा इतिहास साक्षीदार आहे. अन्यायाचा कडेलोट झाल्यावर पेटून उठली ती स्त्रीच! स्वतःच्या कर्तृत्वाची जाणीव झाल्यानंतर गगनभरारीचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले तेही स्त्रीनेच! जगाच्या इतिहासात स्त्रीने आपल्या दुर्दम्य आशावादाने, संघर्षशील वृत्तीने आणि परिस्थितीशी दोन हात करण्याच्या अजोड सामर्थ्याने स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला धाडसाने पुढे येत आहेत आणि धीटपणे व्यक्त होत आहेत. मग तो मंदिर-दर्ग्यातील प्रवेशाच्या सामाजिक अधिकाराचा प्रश्न असो, दारूबंदीसारखा धगधगता विषय असो किंवा निर्भया-कोपर्डीसारखा महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न असो; स्त्रियांच्या आवाजाने संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे. मोर्चे, आंदोलने, सभा आणि संघर्षांची दखल सरकारलाही घ्यावी लागली आहे. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे. तिने आर्थिक स्वातंत्र्य अनुभवले आहे. तिच्या कर्तृत्वाला, विचारांना आणि मतांना घरात तसेच समाजातही महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षण, विज्ञान, प्रशासन, राजकारण, उद्योग, कला, साहित्य आणि क्रीडा अशा असंख्य क्षेत्रांत तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. स्त्रीची सुरक्षितता हा आजही अत्यंत संवेदनशील आणि गंभीर प्रश्न आहे. मात्र आजची स्त्री आत्मविश्वासाने बोलत आहे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहे आणि स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहे. तरीही भारताचा अविभाज्य घटक असलेले ग्रामीण जीवन या परिवर्तनाच्या प्रवाहात काही प्रमाणात मागे असल्याचे चित्र दिसते. सामाजिक संस्था आणि सरकार बदलासाठी प्रयत्नशील असले, तरी शतकानुशतके रुजलेल्या मानसिकता आणि परंपरा बदलण्यासाठी वेळ लागणार आहे. शहर आणि खेडे यांची तुलना केली, तर स्त्रीवरील अन्याय आणि अत्याचार संपलेले नाहीत; केवळ त्यांची रूपे बदलली आहेत. ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया आजही घराच्या चार भिंतींत अडकलेल्या आहेत, तर शहरातील शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र स्त्रीसुद्धा पूर्णपणे सुरक्षित नाही. आर्थिक स्वातंत्र्याबरोबर स्त्रीला स्वतंत्र विचार मिळाले, शिक्षण मिळाले, नोकरी मिळाली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची—‘स्वत्वाची’ जाणीव झाली. ही जाणीव स्त्रीच्या प्रगतीसाठी आवश्यकच आहे. मात्र स्वातंत्र्य आणि जबाबदारी, आत्मसन्मान आणि आत्मकेंद्रीपणा, अधिकार आणि कर्तव्य यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा ओळखणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या जीवनशैलीचा कुटुंबव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. विवाहाचे वाढते वय, करिअरला दिले जाणारे प्राधान्य, नात्यांमधील अपेक्षा, संवादाचा अभाव आणि तडजोडीकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याची वृत्ती यामुळे अनेक नवी आव्हाने निर्माण होत आहेत. मात्र या बदलांची जबाबदारी केवळ स्त्रीवर टाकणे योग्य ठरणार नाही. सुदृढ कुटुंब आणि संवेदनशील समाज निर्माण करण्याची जबाबदारी स्त्री आणि पुरुष—दोघांचीही समान आहे. एक स्त्री म्हणून आज प्रत्येक सखीला एवढेच सांगावेसे वाटते— ‘सखे, भानावर ये!’ आजचे स्थान तू सहज मिळवलेले नाहीस गं! त्यामागे असंख्य स्त्रियांचा संघर्ष आहे, त्याग आहे, अश्रू आहेत, वेदना आहेत आणि कित्येक पिढ्यांची तपश्चर्या आहे. हे स्थान मिळवण्यासाठी तू खूप काही सोसलेस आणि खूप काही गमावलेसही! म्हणूनच तुझ्यातील संवेदनशीलता हरवू देऊ नकोस. तुझी सहनशीलता म्हणजे कमजोरी नाही आणि तुझा आत्मसन्मान म्हणजे अहंकार नाही. आत्मसन्मान आणि आत्ममग्नता यांच्यामधील पुसट सीमारेषा वेळीच ओळख. तुला हवे ते साध्य करण्याची अफाट शक्ती तुझ्यात आहे. संकटांशी झुंजण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची जिद्द तुझ्यात आहे आणि संपूर्ण समाजाला नवी दिशा देण्याची क्षमताही तुझ्यातच आहे. फक्त स्वतःला ओळख… स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव ठेव… स्वातंत्र्य जप, पण संवेदनशीलताही जप… आत्मसन्मान जप, पण नात्यांमधील ओलावाही जप… कारण तू केवळ एक स्त्री नाहीस… तू एक शक्ती आहेस! तू संघर्ष आहेस! तू सृजन आहेस! आणि तूच परिवर्तनाची खरी सुरुवात आहेस!!


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!