अबकी बार… कुणाचं सरकार? की पुन्हा जनतेचाच पराभव?


जनता प्रभाव संपादकीय अग्रलेख

निवडणुका आल्या की लोकशाहीचा उत्सव सुरू होतो. चौकाचौकांत झेंडे फडकतात… घोषणांचा आवाज घुमतो… आश्वासनांचा पाऊस पडतो… नेत्यांच्या सभा रंगतात… पक्षांतरांना वेग येतो… आणि पाच वर्षे दुर्लक्षित राहिलेला मतदार अचानक ‘राजा’ बनतो! पण प्रश्न असा आहे—हा राजा फक्त मतदानाच्या दिवसापुरताच का? मतदान झाले… निकाल लागला… सरकार स्थापन झाले… मंत्री झाले… सत्तेची खुर्ची मिळाली… आणि जनता? ती पुन्हा महागाईच्या विळख्यात, बेरोजगारीच्या गर्तेत, घरासाठी संघर्ष करत, उपचारांसाठी धडपडत, शिक्षणाच्या वाढत्या खर्चाखाली दबलेली आणि न्यायासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत राहिली! मग खरा प्रश्न ‘अबकी बार कुणाचं सरकार?’ हा आहे का? की—‘अबकी बार जनतेच्या वाट्याला नेमकं काय?’ भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला समान मतदानाचा अधिकार दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मतपेटीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या हातात सत्ताधाऱ्यांचे भविष्य ठरविण्याची ताकद दिली. पण आज त्या मताची किंमत आपण खरोखर ओळखतो आहोत का? निवडणूक आली की कुणाला धर्म आठवतो… कुणाला जात आठवते… कुणाला प्रांत आठवतो… कुणाला भाषा आठवते… तर कुणाला अचानक गरीब, शेतकरी, कामगार, महिला, तरुण आणि झोपडपट्टीतील जनता आठवते! निवडणूक संपली की जनता पुन्हा विस्मृतीत! सत्ताधारी म्हणतात—आम्ही विकास केला! विरोधक म्हणतात—सरकारने काहीच केले नाही! नेते म्हणतात—आम्ही जनतेसाठी लढतो! पक्ष म्हणतात—देश आणि राज्य आमच्याच हातात सुरक्षित आहे! पण सामान्य माणूस विचारतोय—माझ्या मुलाच्या हाताला रोजगार कुठे आहे? महागाईपासून दिलासा कुठे आहे? शेतकऱ्याच्या घामाला योग्य दाम कुठे आहे? गरीबाला परवडणारे शिक्षण आणि उपचार कुठे आहेत? बेघरांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर कुठे आहे? भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाई कुठे आहे? आणि सर्वांत महत्त्वाचे—सामान्य माणसाला न्याय कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? सत्ता मिळवण्यासाठी कालचे शत्रू आज मित्र होतात… आजचे मित्र उद्या शत्रू होतात… पक्ष फुटतात… आघाड्या तुटतात… नवीन आघाड्या जन्माला येतात… विचारधारा बदलतात… निष्ठा बदलतात… झेंडे बदलतात… पण जनतेचे प्रश्न मात्र बदलत नाहीत! कालही बेरोजगारी होती… आजही आहे. कालही महागाई होती… आजही आहे. कालही शेतकरी संकटात होता… आजही आहे. कालही गरीब न्यायासाठी भटकत होता… आजही भटकतोय. मग बदलले तरी काय? फक्त सत्तेतील चेहरे? लोकशाहीत जनता सर्वोच्च आहे, असे प्रत्येक राजकीय पक्ष सांगतो. मग हीच जनता पाच वर्षे प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर का उतरते? तक्रारींची दखल का घेतली जात नाही? सरकारी कार्यालयांत सामान्य नागरिकाला न्यायासाठी वर्षानुवर्षे का भटकावे लागते? निवडणुकीपूर्वी मतदारांच्या दारात हात जोडणारे नेते निवडून आल्यानंतर सामान्य जनतेपासून इतके दूर का जातात? लोकशाही जनतेसाठी आहे की सत्तेसाठी? हा प्रश्न आता विचारावाच लागेल. मतदारांनो, तुमच्या एका मताची किंमत ओळखा! उमेदवाराची जात पाहण्यापूर्वी त्याचे काम पाहा. धर्म पाहण्यापूर्वी त्याची माणुसकी पाहा. पक्षाचा झेंडा पाहण्यापूर्वी त्याची जनतेप्रती निष्ठा पाहा. भाषण ऐकण्यापूर्वी त्याच्या कामाचा हिशेब मागा. सोशल मीडियावरील प्रचार पाहण्यापूर्वी आपल्या परिसरातील वास्तव पाहा. आणि सर्वांत महत्त्वाचे—पाच वर्षे ज्याने तुम्हाला विसरले, त्याला मतदानाच्या दिवशी तुम्ही का आठवावे? मत म्हणजे दान नाही. मत म्हणजे उपकार नाही. मत म्हणजे व्यवहार नाही. मत म्हणजे संविधानाने सामान्य नागरिकाच्या हातात दिलेले सर्वांत शक्तिशाली लोकशाही अस्त्र आहे! त्याचा वापर विचारपूर्वक झाला पाहिजे. कारण चुकीचा उमेदवार निवडल्याची किंमत एका दिवसासाठी नव्हे, तर पुढील पाच वर्षे संपूर्ण समाजाला मोजावी लागते. देशाला केवळ सरकार नको आहे, जबाबदार सरकार हवे आहे! राज्याला केवळ सत्ताधारी नको आहेत, जनतेला उत्तर देणारे लोकप्रतिनिधी हवेत! लोकशाहीला केवळ निवडणुका नको आहेत, जागृत, निर्भीड आणि प्रश्न विचारणारा मतदार हवा आहे! आज प्रश्न हा नाही की कोण जिंकणार? प्रश्न हा नाही की कोण मुख्यमंत्री होणार? प्रश्न हा नाही की कोण पंतप्रधान होणार? खरा प्रश्न आहे—या निवडणुकीत जनता जिंकणार का? की पुन्हा एकदा नेते जिंकतील… पक्ष जिंकतील… सत्ता जिंकेल… आणि जनता हरवेल? ‘अबकी बार कुणाचं सरकार?’ याचे उत्तर मतमोजणीच्या दिवशी मिळेल. पण ‘अबकी बार जनतेचं काय?’ या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक मतदाराने मतदान करण्यापूर्वी शोधले पाहिजे! कारण सरकार कोणाचेही आले तरी संविधानापेक्षा कोणी मोठे नाही! जनतेच्या प्रश्नांपेक्षा कोणतीही सत्ता महत्त्वाची नाही! आणि लोकशाहीत जनतेपेक्षा कोणीही शक्तिशाली नाही! सत्ता येईल… सत्ता जाईल… नेते येतील… नेते जातील… पक्ष उभे राहतील… पक्ष फुटतील… राजकीय समीकरणे बदलतील… पण देश टिकला पाहिजे! संविधान टिकले पाहिजे! लोकशाही टिकली पाहिजे! आणि सर्वांत महत्त्वाचे—जनता जिंकली पाहिजे! कारण सत्ता कुणाचीही असो… प्रश्न जनतेचे सुटले पाहिजेत! संविधान टिकले पाहिजे… लोकशाही जिंकली पाहिजे… आणि अंतिम प्रभाव जनतेचाच असला पाहिजे!!!

आवाज लोकशाहीचा!!! प्रभाव जनतेचा!!!

— ईश्वर ताथवडे-संपर्क -9967999300
संपादक, जनता प्रभाव न्यूज


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!