ग्रामीण व दुर्गम भागातील खेळाडूंना संधी, क्रीडा पायाभूत सुविधा आणि राज्यांमधील समन्वय वाढविण्यावर चर्चा
गुवाहाटी | प्रतिनिधी : क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात डॉ. निलेश राणे यांनी आसाम मंत्रालयात मुख्यमंत्री यांचे सचिव, आमदार तसेच आसाम क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तरंगा गोगोई यांची भेट घेतली. या भेटीत देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत ग्रामीण आणि दुर्गम भागातील होतकरू खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देणे, क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करणे आणि युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत विचारविनिमय झाला. तसेच विविध राज्यांमधील क्रीडा क्षेत्रातील समन्वय वाढविणे, गुणवंत खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी परस्पर सहकार्य अधिक प्रभावी करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रतिभावान खेळाडू असून, त्यांना योग्य संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येऊ शकते. त्या दृष्टीने क्रीडा सुविधा आणि प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या मुद्द्यावर बैठकीत भर देण्यात आला. सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत क्रीडा क्षेत्रातील सहकार्य वाढविणे, युवकांसाठी नव्या संधी निर्माण करणे आणि क्रीडा विकासाला चालना देण्यासंदर्भात विविध मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली.

