सलग चार दिवसांच्या संततधार पावसाचा सकारात्मक परिणाम; पाणीसाठा १५.४७ टीएमसीवर, धरण क्षमतेच्या २०.३४ टक्क्यांपर्यंत वाढ
प्रतिनिधी | कोयनानगर : सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रासाठी दिलासादायक चित्र निर्माण केले आहे. राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणात पाण्याची आवक वेगाने वाढत असून, धरणातील पाणीसाठा १५.४७ टीएमसी इतका झाला आहे. हा साठा धरणाच्या एकूण क्षमतेच्या २०.३४ टक्के असून, आगामी काळात जलसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.गेल्या चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची भर पडत आहे. कोयनानगर येथे ३७१ मिमी, नवजा येथे ५३१ मिमी, तर महाबळेश्वर येथे ४९१ मिमी पावसाची नोंद झाली असून, केवळ मागील तीन दिवसांतच झालेल्या मुसळधार पावसामुळे जलपातळीत सातत्याने वाढ होत आहे.कोयना धरणातील वाढता पाणीसाठा हा शेतकऱ्यांसाठी, पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी आणि जलविद्युत निर्मितीसाठी अत्यंत आश्वासक मानला जात आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविल्याने धरण आणखी वेगाने भरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, धरण प्रशासनाने परिस्थितीवर चोवीस तास बारकाईने लक्ष ठेवले असून, पाण्याची आवक, जलपातळी आणि संभाव्य परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आवश्यक त्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत.
जनता प्रभाव न्यूज आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!


