११ वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीची मागणी; दोषी कंत्राटदारास कठोर शिक्षा करण्याचा आग्रह
मुंबई | जनता प्रभाव न्यूज नेटवर्क-: चेंबूर येथे ३० जून २०२६ रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या हृदयद्रावक घटनेनंतर आता दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत, संबंधित कंत्राटदारावर केवळ दंडात्मक कारवाई न करता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ठाम मागणी केली आहे.
राहुल शेवाळे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे की, स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामादरम्यान झाडांच्या मुळांचे संरक्षण करण्यात गंभीर निष्काळजीपणा झाला. याच हलगर्जीपणामुळे झाड कोसळून एका निष्पाप विद्यार्थ्याचा जीव गेला, असा स्थानिक नागरिकांचा आरोप असून त्याची निष्पक्ष, सखोल आणि जबाबदारी निश्चित करणारी चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
त्यांनी आयुक्तांना विनंती केली आहे की, या प्रकरणातील संबंधित विभागीय अधिकारी आणि कंत्राटदारांची भूमिका तपासून जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी.
“केवळ दंड पुरेसा नाही; गुन्हा दाखल होणे आवश्यक!”
राहुल शेवाळे यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हणाले की,
“११ वर्षीय विद्यार्थ्याचा जीव गेला आहे. अशा गंभीर प्रकरणात केवळ आर्थिक दंड ठोठावून जबाबदारी संपत नाही. दोषी कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”
या मागणीमुळे चेंबूर दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याबाबत प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागरिकांनीही भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कामांच्या दर्जाची तपासणी, झाडांचे वैज्ञानिक संरक्षण आणि दोषींवर कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
जनता प्रभाव न्यूज
आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!


