मुंबई | पार्कसाईट पोलिसांनी दुचाकीवरून सोनसाखळी खेचून जबरी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून दोन सोनसाखळ्या चोरीचे आणि दोन मोटारसायकल चोरीचे असे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची लगड आणि दोन मोटारसायकली असा एकूण ५ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पार्कसाईट पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०२६ रोजी दाखल झालेल्या तक्रारीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी फिर्यादीला धक्का देऊन त्यांचे सुमारे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून नेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. घटनेनंतर दुचाकी चालविणाऱ्या आरोपीला पोलीस कर्मचारी, बीट मार्शलचे अंमलदार आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले. मात्र, सोन्याचे मंगळसूत्र खेचणारा आरोपी जवळच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पळून गेला होता. त्याचा गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुंडा विरोधी पथकाने शिताफीने शोध घेऊन त्याला ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम सुखराम चौधरी (वय २७), व्यवसाय टॅक्सी चालक, आणि अजय ऊर्फ डब्ल्यू मुन्नीलाल गुप्ता (वय २८), व्यवसाय वायरमन, अशी आहेत. पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासादरम्यान आरोपींकडून पुढील गुन्हे उघडकीस आले— १) पार्कसाईट पोलीस ठाणे गु.र.क्र. ९२५/२०२६ — कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.संहिता २) पार्कसाईट पोलीस ठाणे गु.र.क्र. ९०८/२०२६ — कलम ३०९(४), ३(५) भा.न्या.संहिता ३) भांडूप पोलीस ठाणे गु.र.क्र. ९२५/२०२६ — कलम ३०३(२) भा.न्या.संहिता ४) घाटकोपर पोलीस ठाणे गु.र.क्र. १०६१/२०२६ — कलम ३०३(२) भा.न्या.संहिता या चारही गुन्ह्यांतील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याची एकूण किंमत ५ लाख ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्कसाईट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीन सावंत, पोलीस निरीक्षक अशोक लांडगे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन झाडे, सहायक पोलीस निरीक्षक अतुल ठोंबरे तसेच गुंडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय वाघ, वाल्मीक शिंदे, सानप आणि खैरनार व त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे सोनसाखळी चोरीसह वाहन चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले असून, चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.






