धक्कादायक ! गरीब-गरजू महिलांच्या गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) विक्री करणारे रॅकेटचा भांडाफोड तीन महिलांना अटक


बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बेकायदा गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) विक्री करणाऱ्या तीन महिलांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ठाणे : गरीब – गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) वाढवून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे रॅकेटचा बदलापूर पोलिसांनी भांडाफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. ही घटना बदलापूर पूर्वेतील जोवेली परिसरातील नॅनो सिटी इमारतीमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात बेकायदा गर्भाशयातील स्त्री बीज (अंडी) विक्री करणाऱ्या तीन महिलांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुलक्षणा गाडेकर (44), अश्विनी चाबुकस्वार (29) आणि मंजुषा वानखेडे (46) असे अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

 

आर्थिक व्यवहारांचे पुरावे आढळले : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्वेतील जोवेली भागातील नॅनो सिटी येथील एका इमारतीत सुलक्षणा गाडेकर यांच्या घरातून हे रॅकेट चालत असल्याची माहिती वैद्यकीय पथकाच्या डॉ. ज्योत्स्ना सावंत यांना एका पीडित महिलेने दिली. या माहितीच्या आधारे बुधवारी बदलापूर पूर्व पोलिसांनी डॉ. ज्योत्सना सावंत यांच्या वैद्यकीय पथकासह संयुक्त धाड टाकली. आरोपीच्या मोबाईलमध्ये गर्भधारणेसाठी लागणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोट्या नावांची सत्यप्रतिज्ञापत्रे, बनावट कागदपत्रे तसेच आर्थिक व्यवहारांचे पुरावे आढळले आहेत. गरजू महिलांकडून वारंवार दात्याचे (डोनर) काम करून घेत शारीरिक शोषण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

 

पीडित महिलांना 25 ते 30 हजार रुपये दिले : या प्रकरणात 20 हून अधिक महिलांचा वापर झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, पीडित महिलांना 25 ते 30 हजार रुपये दिले जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. चार वांगणीत सुरू असलेले हे रॅकेट काही दिवसांपासून बदलापूरात हलवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. लाखो-कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या प्रकरणात काही नामवंत डॉक्टर, रुग्णालये आणि बड्या हस्तींची नावे पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांच्या धाडीत महिला आरोपीच्या घरातून स्त्री बीजांची वाढ करण्यासाठी वापरली जाणाऱ्या ( लसी ) इंजेक्शन सापडली. गाडेकर ही गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची सोनोग्राफी करून घेतली जात होती.

 

महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात असल्याची माहिती : इंजेक्शन देऊन गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यानंतर त्या महिलांना आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तेथे शस्त्रक्रिया विभागात अंडी काढून त्यांची विक्री केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. .या प्रकरणी ठाणे उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्सना सावंत यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तीन महिलांना अटक करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!