महापालिकेच्या नोंदीच गायब? मग खासगी कब्रस्तानाला परवानगी मिळाली तरी कशी?


RTI मधून समोर आलेल्या कागदपत्रांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर उपस्थित केले गंभीर प्रश्न; नोंदी नाहीत, पण प्रक्रिया झाली कशी?

 

ठाणे | प्रतिनिधी-:ठाणे महापालिकेच्या कारभारातील धक्कादायक विसंगती माहितीच्या अधिकारातून (RTI) उघड झाल्याचा दावा समोर आला आहे. एकाच प्रकरणात महापालिकेच्या दोन विभागांकडून परस्परविरोधी माहिती देण्यात आल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि अभिलेख व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या अधिकृत उत्तरानुसार, संबंधित जागेची कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे एका विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, दुसऱ्या विभागाने त्याच प्रकरणाशी संबंधित माहिती दिली आहे. त्यामुळे “नोंदच नाही, मग मंजुरी कुणी दिली?” हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे. संबंधित प्रकरण खासगी कब्रस्तानाच्या परवानगीशी निगडित असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. अशा परिस्थितीत जागेची अधिकृत नोंद उपलब्ध नसताना प्रशासकीय प्रक्रिया नेमकी कोणत्या आधारावर पार पडली? संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय घेतला? आणि जर नोंदी अस्तित्वातच नसतील, तर जबाबदारी निश्चित होणार कशी? असे अनेक प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.माहिती अधिकारातून समोर आलेल्या उत्तरांमुळे महापालिकेच्या विभागांतील समन्वयाचा अभाव, अभिलेख व्यवस्थापनातील त्रुटी किंवा प्रशासकीय निष्काळजीपणा यापैकी नेमके काय घडले, याचा उलगडा होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणात संबंधित सर्व मंजुरी, अभिलेख, आदेश आणि प्रशासकीय नोंदी सार्वजनिक करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी. तसेच आवश्यक असल्यास उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रश्नांचा भडीमार…

१) महापालिकेच्या नोंदीच नसतील, तर परवानगी देण्यात आली कशी?

२) एकाच प्रकरणात दोन विभागांची दोन वेगवेगळी उत्तरे का?

३) नोंदी गायब आहेत की जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे?

४) या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का?

माहिती अधिकारातून समोर आलेल्या या विसंगतींमुळे ठाणे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!