मनाचा वेध…मनाशी संवाद • नात्यांचा आरसा • जीवनाचा अर्थ


“आपलं कोण… परकं कोण…?

उत्तर शब्दांत नसतं… ते संकटाच्या काळात मिळतं.”

आपलं कोण, परकं कोण हे संकटाच्या काळातच समजतं. नाहीतर भरतीच्या पाण्यात किनाऱ्यावर उभं राहून फक्त पाय भिजवणारे अनेक असतात; पण वादळात हात धरून साथ देणारे फारच थोडे असतात. माणसाचे आयुष्य हे फक्त सुख-दुःखांची मालिका नाही, तर स्वतःला ओळखण्याचा एक सुंदर प्रवास आहे. या प्रवासात कधी आनंद भेटतो, कधी वेदना, कधी प्रश्न पडतात, तर कधी शांततेचा अनुभव येतो. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक परिपक्व बनवत असतो.

मी एक गोष्ट शिकले आहे… मनात जे आहे ते प्रामाणिकपणे स्वीकारणे, हीच आत्मशांतीची पहिली पायरी आहे. आपल्या भावना, आपल्या चुका आणि आपल्या वेदना नाकारल्या की आपण स्वतःपासूनच दूर जातो. पण जेव्हा आपण शांतपणे स्वतःकडे पाहायला शिकतो, तेव्हा जीवनाचा खरा अर्थ उलगडू लागतो. प्रेम म्हणजे फक्त मिळवणे नाही; प्रेम म्हणजे समजून घेणे, विश्वास ठेवणे आणि कोणाच्याही आयुष्यात दुःख वाढू न देणे. मनात वेदना असल्या तरी त्यातून द्वेष किंवा सूड निर्माण होऊ नये, हीच खरी माणुसकी आहे. भगवान बुद्धांनी अनुभवाला सर्वोच्च स्थान दिले. त्यांनी सांगितले, “सत्य स्वतः अनुभवा; फक्त ऐकून स्वीकारू नका.” जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. दुःख आपल्याला संवेदनशील बनवते आणि करुणा आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवते. आपण साधी माणसं आहोत. आपल्यालाही थकवा येतो, डोळे भरून येतात, चुका होतात; पण पुन्हा प्रेमाने, विश्वासाने आणि नव्या उमेदीने उभं राहण्याची ताकदही आपल्यातच असते. खरी श्रीमंती पैसा, पद किंवा प्रसिद्धीत नसते. ती असते दुसऱ्याला न दुखावण्यात, त्याच्या वेदना समजून घेण्यात आणि आपल्या मनात करुणा जपण्यात. हीच आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे.

“अत्त दीप भव” — स्वतःचा प्रकाश स्वतः बना.

कारण जेव्हा मनातील अंधार दूर होतो, तेव्हा बाहेरचं जग अधिक सुंदर, अधिक आशादायी आणि अधिक माणुसकीने भरलेलं दिसू लागतं.

“स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणारा माणूस कधीच हरत नाही; कारण त्याचा विजय इतरांवर नसतो, तर स्वतःवर असतो.”                     लेखिका : सरु

                                         मो. ८९२८८५६८०२

जनता प्रभाव न्यूज–आवाज लोकशाहीचा!! प्रभाव जनतेचा!!!


81
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!