कल्याणमध्ये बहुजन महापुरुषांना संगीतिमय मानवंदना ३० जून रोजी भव्य गौरव सोहळा
समाजभूषण पुरस्कारांचे वितरण; नागरिकांना कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन
ठाणे | प्रतिनिधी -: महान संत, समाजसुधारक आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा जागर संगीताच्या माध्यमातून घडविण्यासाठी कल्याणमध्ये “महापुरुषांना संगीतिमय मानवंदना” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील समस्त कलाकारांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आयोजकांनी नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले. हा प्रेरणादायी कार्यक्रम मंगळवार, ३० जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता कल्याण (पश्चिम) येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला असून, नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.पत्रकार परिषदेत संगीत कला अकॅडमी महाराष्ट्रचे अध्यक्ष संतोष चौधरी (दादुस) यांनी सांगितले की, “महापुरुषांनी दिलेला समता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा संदेश संगीताच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. समाजाला प्रेरणा देणारे विचार सांस्कृतिक माध्यमातून अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचावेत, हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.” कार्यक्रमात राज्यातील नामवंत गायक-गायिका आणि कलाकारांच्या सादरीकरणातून विविध महापुरुषांना संगीतमय अभिवादन करण्यात येणार आहे. संगीत, विचार आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून नागरिकांना मिळणार आहे.यावेळी समाजात निस्वार्थ, त्यागी आणि समर्पित भावनेने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक पर्व न राहता समाजसेवेचा गौरव करणारा प्रेरणादायी सोहळा ठरणार आहे.पत्रकार परिषदेला अतुल भोईर, सतीश अप्पा सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील कलाकार, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.


