एकनाथ शिंदे-: शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग; उपमुख्यमंत्र्यांच्या चॉपरला वादळाचा फटका,थोडक्यात अनर्थ टळला
एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरनं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग केलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदे मुरबाडला जात होते. पण त्यांचं हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेनं वळवण्यात आलं. जुहू विमानतळावर त्यांच्या हेलिकॉप्टरनं लँडिंग केलं.
मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका बसला आहे. सोसाट्याचा वारा आणि धुळीच्या वादळामुळे एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं एमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. एकनाथ शिंदे मुंबईहून मुरबाडला जात होते. एका लग्न सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री मुरबाडला निघाले होते. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा तडाखा बसला. पायलटनं प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेनं वळवलं. जुहूतील विमानतळावर हेलिकॉप्टर लँड करण्यात आलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरुन हेलिकॉप्टरनं निघाले होते. मुरबाडमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी शिंदे हेलिकॉप्टरनं मुरबाडला निघाले. पण कल्याण परिसरातील धुळीच्या वादळाचा फटका शिंदेंच्या हेलिकॉप्टरला बसला. या कठीण प्रसंगात पायलटनं समयसूचकता दाखवली. हेलिकॉप्टर जवळपास १० ते १५ मिनिटं धुळीच्या वादळात अडकलं होतं. पायलटनं प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेनं वळवलं. जुहूतील विमानतळावर हेलिकॉप्टर सुरक्षित लँड झाले. शिंदे आणि त्यांच्या सोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळे सुरक्षित आहेत. पायलटच्या प्रसंगावधानानं मोठा अनर्थ टळला आहे. कल्याण, डोंबिवलीत धुळीचं वादळ
निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे दिवा, डोंबिवली, कल्याण, मलंगगड परिसर आणि ग्रामीण भागात चारच्या सुमारास धुळीचे वादळ आलं. शहरावर पसरलेल्या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावल्याचं बोलल जात आहे.असंच धुळीचं वादळ गेल्या वर्षीही आलं होतं. महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसंच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. सद्य परिस्थिती पाहता तो खरा होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लागली असून कल्याण, डोंबिवली, दिवा आणि आसपासच्या ग्रामीण परिसरात आज सकाळपासूनच वातावरणात उष्णता वाढली होती. त्यातच दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे जिल्हातील काही शहर आणि ग्रामीण परिसरात काही काळ धुळीच्या चादरी आड झाकोळली गेली होती.जोरदार वाऱ्यांमुळे ठाणे जिल्ह्यातील काही शहरामध्ये रस्त्यांवर, इमारतींवर, झाडांवर साचलेली धूळ मोठ्या प्रमाणात हवेत उडाल्यानं काही काळ दृश्यमानता कमी झाली होती. दरम्यान, शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. परिणामी श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांना त्याचा मोठा त्रास झाला आहे.

