मुंबई-:
सानेगुरुजी प्रतिष्ठान, मिरज व राष्ट्रसेवा दल, सांगली यांच्या सहयोगाने दिला जाणारा “साने गुरुजी कार्यगौरव पुरस्कार” दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपत पाटील यांच्या हस्ते भाकर फाऊंडेशन, मुंबई यांना प्रदान करण्यात आला.या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व फुलांचे रोप असे होते.यावेळी भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनावणे यांनी मनोगत व्यक्त करताना महिला, बालक व तृतीयपंथीयांच्या समस्या आणि त्यावरील उपाय याबाबत भूमिका मांडली.राष्ट्रसेवा दल हे आपले कुटुंब असल्याचे सांगत, कुटुंबातील ज्येष्ठांकडून आपल्या कार्याची दखल घेऊन मिळणारी कौतुकाची थाप ही आपली जबाबदारी अधिक वाढवते, असे त्यांनी नमूद केले.
या पुरस्कारातून मिळालेल्या एकवीस हजार रुपयांपैकी काही रक्कम भाकर फाऊंडेशनच्या पोषण आहार उपक्रमासाठी वापरण्यात येणार असून, उर्वरित रक्कम साथी चंदूभाई मेहता समाजसेवा प्रतिष्ठानच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या देणगी संकलन मोहिमेच्या माध्यमातून नर्मदा बचाव आंदोलनाच्या ‘जीवन शाळा’ उपक्रमासाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कै. सदुभाऊ गोसावी व कै. प्रभावती गोसावी यांच्या स्मरणार्थ बेळगाव येथील ज्येष्ठ गांधीवादी व निसर्गमित्र डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांना साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना गणपत पाटील म्हणाले की, साने गुरुजींचे विचार जगलेल्या आणि राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून आयुष्यभर समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान होणे आज अत्यंत आवश्यक आहे.
प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. आनंद मेणसे (बेळगाव) यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. शिवाजीदादांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. तसेच भाकर फाऊंडेशनच्या माध्यमातून झोपडपट्टीत तरुणांनी केलेले सामाजिक कार्यही त्यांनी उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
या प्रसंगी डॉ. रामचंद्र शांत,पी. डी. कुंडले, विद्याताई स्वामी, चंपावती मगदूम आदी ज्येष्ठ नागरिकांना साने गुरुजी परिवार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास गोसावी यांनी केले, आभार प्रदर्शन रमेश हेगाणे यांनी केले, कार्यक्रमाच्या शेवटी श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजन
सदाशिव मगदूम यांनी केले होते.







