FSSAI चे ऐतिहासिक पाऊल — MSMEs च्या अन्न परवान्यांचे नूतनीकरण आता कायमचे बंद; परवाने आजीवन वैध!


FSSAI चे ऐतिहासिक पाऊल — MSMEs च्या अन्न परवान्यांचे नूतनीकरण आता कायमचे बंद; परवाने आजीवन वैध!

CASMB च्या “प्रेरणा” महिला सक्षमीकरण शिखर परिषदेत डॉ. अलका राव यांची ऐतिहासिक घोषणा

मुंबई: अन्न व्यवसाय करणाऱ्या लघु व मध्यम उद्योजकांना (MSMEs) यापुढे FSSAI परवान्याचे नूतनीकरण करावे लागणार नाही — हे परवाने आता आजीवन वैध राहतील. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) सल्लागार डॉ. अलका राव यांनी मुंबईत झालेल्या CASMB च्या “प्रेरणा” महिला सक्षमीकरण शिखर परिषद व 6 व्या स्थापना दिन सोहळ्यात ही ऐतिहासिक घोषणा केली.

MSMEs वरील अनुपालन भार कमी करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या व्यापक नियामक सुधारणांचा हा भाग असून उलाढाल मर्यादेत बदल, दुहेरी अनुपालन रद्द आणि जोखीम-आधारित तपासणी पद्धतीचा यात समावेश आहे.

डॉ. अलका राव यांनी आपल्या भाषणात अन्नप्रक्रिया उद्योगातील धोरणाबाबत स्पष्ट, सखोल आणि दूरदृष्टी असलेले विवेचन केले. उपस्थित लघु-मध्यम उद्योजक नव्या नियमांबाबत आश्वस्त व उत्साहित होऊन घरी परतले.

लघु-मध्यम उद्योगांसाठी नियामक सुधारणा — एक नवा अध्याय

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजित पुनहानी आणि अध्यक्षा पुण्यशीला श्रीवास्तव- ज्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिवही आहेत-यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली डॉ. राव यांनी पुढील प्रमुख सुधारणा जाहीर केल्या:

• FSSAI परवाने व नोंदणी आता आजीवन वैध नूतनीकरणाची गरज संपुष्टात; दीर्घकालीन अनुपालन समस्येवर कायमचा तोडगा
• उलाढाल मर्यादेत सुधारणा — रु.1.5 कोटीपर्यंत नोंदणी; रु.50 कोटीपर्यंत राज्य परवाना; रु.50 कोटीहून अधिक उलाढालीसाठी केंद्रीय परवाना
• दुहेरी अनुपालन आवश्यकता रद्द — लहान व्यावसायिक तसेच पथारी व्यावसायिकांना विशेष लाभ
• जोखीम-आधारित तपासणी पद्धत — पारदर्शी, कार्यक्षम आणि विश्वासावर आधारित नियामक देखरेख

नवउद्योग व MSMEs साठी विशेष उपाययोजना

• साप्ताहिक संवाद बैठका — अन्न व्यवसाय चालकांसाठी नियामक प्रश्नांचे त्वरित निराकरण व मार्गदर्शन
• साप्ताहिक अद्ययावत पारदर्शी मंजूर ट्रॅकर — उत्पादन मंजुरीत सुस्पष्टता व जवाबदारी
• नियमित भागधारक सल्लामसलत — व्यवसाय सुलभतेत उल्लेखनीय सुधारणा
• पुनर्वापर केलेल्या PET (rPET) ला अन्न संपर्काची मंजुरी — टिकाऊपणाच्या उद्दिष्टासाठी उद्योगाला पाठबळ

FSSAI राष्ट्रीय Codex संपर्क बिंदूचा सन्मान

MSMEs मधील उद्योग सहभाग बळकट करण्यात व नियामक जागरूकता वाढवण्यातील सातत्यपूर्ण योगदानाबद्दल FSSAI च्या राष्ट्रीय Codex संपर्क बिंदू (NCC) ला कार्यक्रमात CASMB राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.


57
कृपया वोट करा

जनता प्रभाव न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!