मुंबई: मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र, आता याच कोस्टल रोडवरून एक नवा वाद समोर आला आहे. कोस्टल रोडवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला असून, प्रशासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे.
नेमका वाद.?
मुंबईच्या किनारपट्टीवरून धावणाऱ्या या मार्गावर सध्या ‘जय हो’ हे गाणे वाजवले जात आहे. ऑस्कर विजेते हे गाणे जागतिक स्तरावर गाजलेले असले तरी, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत अशा सार्वजनिक प्रकल्पावर हे गाणे वाजवण्याला मनसे नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मते, हा प्रकल्प मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला आहे, त्यामुळे येथे स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे.
मनसेची मागणी व ठाम भूमिका
मनसे नेत्यांनी प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे की, कोस्टल रोडवर ‘जय हो’ हे गाणे तत्काळ बंद करून त्याऐवजी अधिकृत ‘महाराष्ट्र गीत’ म्हणजेच ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे गीत वाजवले जावे. महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान जागृत करणाऱ्या गीताला अशा महत्त्वाच्या ठिकाणी प्राधान्य मिळायला हवे, अशी ठाम भूमिका मनसेने मांडली आहे.
या संदर्भात मनसे नेत्यांनी सोशल मीडिया आणि अन्य माध्यमांतून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत होत असलेल्या विकासकामांचे स्वागत आहेच, परंतु त्यासोबतच मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राच्या संस्कृति वारशाचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. केवळ परप्रांतीय किंवा बॉलीवूड धाटणीचे गाणे न वाजवता , जे गाणे राज्याची ओळख अधोरेखित करतात, तेच गाणे सार्वजनिक ठिकाणी वाजवले जावेत, अशी ठाम भूमिकेसहित मनसेकडून मागणी केली जात आहे.
प्रशासनाकडून प्रतिसादाची प्रतीक्षा
कोस्टल रोड हा मुंबई महानगरपालिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या ठिकाणी पर्यटकांची आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत मनसेने घेतलेल्या या भूमिकेनंतर आता प्रशासन या गाण्याबाबत काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान आणि आदर करत प्रशासन ‘महाराष्ट्र गीत’ सुरू करणार की जुनेच गाणे कायम ठेवणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.







